चुलीवरची खीर कविता
चुलीवरची खीर
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कपुरी मग गुरफटून बसली
काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना
झाऱ्यानं टोचलं, ते ही तिला बोचलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली
पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल
मन आले भरू, डोळे लागले झरू
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली
खीर थंड झाली वाटीत बसून आली
लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली
‘‘पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझे म्हणणे ऐक गडे’’... पण अं हं...
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली
तिकडून ताई आली,तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली
तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली
कढईतील पुरी मग कध्धी नाही रुसली
- निर्मला देशपांडे
Comments
Post a Comment